कथा छोट्या दोस्तांसाठी | गंपू आणि आजीची टॉफी




आपला छोटा, निरागस गंपू आता काही लहान राहिला न्हवता. इयत्ता चौथीत गेल्यापासून त्याला मोठं झाल्यासारखं वाटू लागल होत. पूर्वी कंटाळत केस विंचरून घेणारा गंपू आता स्वतःहून आरशासमोर उभा राहून नीट भांग पाडू लागल होता. आतल्या खोलीतून हे दृश्य रोज पाहून आजीला गम्मत वाटत असे.
तितकाच चुणचुणीत पण उगीचच मोठ्या मुलांसारखं वागणारा, क्रिकेट कमी आणि बुद्धीबळ अधिक खेळायला लागलेला, अन्या आणि निन्या या त्याच्या मित्रांबरोबर बोलणं कमी झालेला, गंपू बराच बदलला होता. आता त्याच्या गालालाही कोणी हात लावलेला त्याला चालत नसे. मुळात त्याला गंपू म्हटलेलंहि आता आवडत नसे. त्याचं पाळण्यातलं नाव विनायक होतं. बल्लाळ दादाच्या पाठोपाठ गंपूहि रोज सकाळी व्यायामशाळेत जात असे. पण पेढे, श्रीखंड आणि मोदकाचं वेड असणाऱ्या गंपूच पोट काही केल्या कमी मात्र होत न्हवतं.
शाळेतल्या स्पोर्ट्स डे मधे बुद्धिबळात मेडल जिंकून गंपू एके दिवशी घरी आला. आल्याआल्या आजीला घट्ट मिठी मारून त्याने हि बातमी तिला दिली. आजीने लगेच डब्यातली एक टॉफी काढून गंपूच्या हातावर ठेवली. 'दर वेळी काय गं टॉफी देतेस. आता मी काय लहान नाहीये टॉफी खायला,' गंपू लगेच म्हणाला.
गंपूचा आवाज ऐकून बाबा बाहेर आले. 'काय कुरकुर चाललीये आजीकडे सकाळीच? अरे वा! जिंकलास का स्पर्धेत? छान!' असं म्हणत त्यांनी गंपूची पाठ थोपटली.
'बाबा, तुम्हीच सांगा. मी आता लहान आहे का हो टॉफी खायला? मला आज समोसा खायचाय शाळेसमोरच्या दुकानातून. आजीला काही समजतच नाही. तुम्ही द्या ना ५ रुपये,' गंपू केवीलवाण्या स्वरात म्हणाला.
'समोसा वगैरे काही नाही. गपचूप हाथ धुऊन ये आणि आजीने दिलेली ती टॉफी खा.' कडक शिस्तीचे बाबा गंपूच्या विनवणीला नमले नाहीत.
'पण मला समोसाच हवाय...' असं म्हणत गंपूने चक्क टॉफी जमिनीवर फेकून दिली. आजीने लगेच बटव्यातून ५ रुपये काढून गंपूच्या हातात कोंबले आणि त्याला घराबाहेर पिटाळला.
 'तुझ्या या लाडानेच तो इतका शेफारलाय. आज चक्क त्याने टॉफी फेकून दिली. असच चालू राहिलं तर तो बिघडायला वेळ लागणार नाही.' भिंतीवरच्या घड्याळाने नऊ टोल पूर्ण केले.
'तू कुठे रे बिघडलायस? उसाचा रस प्यायचाय म्हणून शाळेतून येताना तू हि हट्ट धरून बसायचास. आपला गंपू अजून लहान आहे. समज येईल त्याला लवकरच.'
' खरंय. कितीही बक्षिसं मिळवली तरी या टॉफी एवढं मोठं बक्षीस मला कुणीही देऊ शकणार नाही हे समजायला मलाही थोडा वेळ लागला होता,' गंपूचे बाबा जमिनीवर पडलेली टॉफी उचलत शांतपणे म्हणाले.

- हेरंब
Author of The Last Nomad
ISupportNAAM

Comments