लेख: देवराईतील रायवळ आंबा


आज सिद्धार्त दादाची झाडांसंबंधीची फेसबुकवर पोस्ट पाहून काही महिन्यांपूर्वी घडलेल्या एका घटनेची आठवण झाली.

 

डेक्कन कॉलेज, पुणे, येथे शिकताना भेटलेला एक मित्र म्हणजे अरुणाचल प्रदेशचा बानवांग लोसू. एके दिवशी तो मैदानात काहीतरी उपसताना दिसला. पाहिलं तर चक्क शंभरच्या वर रोपांचा ढीग! जमिनीत उगवलेलं तण म्हणून ती टाकून देण्यात येत होती पण बानवांगने ती दुसरीकडे नेऊन ठेवली. झाडांचे वेड असल्यामुळे मी ही या प्रकारात ओढला गेलो. मुळात हे करण्यामागे निदान माझा तरी कोणताच मोठा विचार नव्हता. त्या क्षणी आमचा हेतू केवळ ती रोपं जगवण्याचा होता. मुंबईसारख्या शहरात मोकळ्या जागा आणि खास करून वृक्ष लावण्यासाठी जागा यांची वानवा अनुभवल्यामुळे घरातील कुंडीपुरतेच माझे निसर्गप्रेम मर्यादित राहिले. एकदम इतकी रोपं लावण्याची संधी पाहून मी चक्क झपाटलो गेलो.

 

साधारणपणे ती आंब्याची रोपं असल्याचे समजले पण नेमकी कोणती व्हरायटी हे समजत नव्हते. एकूण संख्या मोजल्यावर आमच्या लक्षात आले की ती चक्क २५० होती! पुढचा मागचा विचार न करताआम्ही त्यांची रोपं करण्याचे ठरवले. आमचा मित्र संजय हरगुडे याच्या मदतीमुळे २ दिवसात आम्ही सगळी रोपं तयार केली. आता प्रश्न होता की ही नक्की लावायची कुठे? काही मित्रमैत्रिणींनी घेतलेली रोपं वगळता उरलेली रोपं कुणी फुकटही न्यायला तयार नव्हतं.

 

अनेक जणांना भेटल्यावर यातून आपल्यालाच काहीतरी मार्ग काढावा लागेल हे चित्र लगेच स्पष्ट झालं. नर्सरी, एनजीओं अशा अनेकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण काहीच यश आले नाही. अखेरआदित्य कुलकर्णीमुळे धनंजय शेडबाळे आणि लालासो माने यांच्या संपर्कात आलो. लाला यांनी काहीच दिवसात चक्क २२० रोपं नेली आणि आम्ही सुखावलो. उरलेली काही रोपे कॉलेजच्या आवारात मित्रांच्या मदतीने लावली. आम्ही या सगळ्यात एवढा वेळ का 'वाया' घालवला हे फक्त झाडं लावलेल्या माणसालाच अचूकपणे कळू शकेल. 

 

काही दिवसातच लालांनी सांगितले की ती रायवळ आंब्याची रोपं आहेत आणि त्यांच्या देवराई फौंडेशनकडून राबविण्यात येणाऱ्या मोहिमे अंतर्गत शेतकऱ्यांना मोफत देण्यात येतील. हे सगळं रामायण घडल्यानंतर अचानक एक दिवस देवराई बद्दल पूर्वी कधीतरी ऐकल्याचं आठवलं आणि मनात दुवा जुळला तो म्हणजे अभिनेता सयाजी शिंदे आणि त्यांच्या या संस्थेच्या कामाशी.

 

ही पोस्ट लिहिण्याचे कारण म्हणजे सध्याच्या अनिश्चिततेच्या वातावरण जेव्हा केव्हा मी 'अरे याने काय होणारे? आपण एकट्याने करून काय फरक पडणारे...' किंवा तत्सम वाक्य ऐकतो तेव्हा हसू येतं आणि आठवतात ती देवराईतील रायवळ आंब्याची रोपं.

 

छायाचित्रे

 

१. रोपं बनवताना बानवांग लोसू


२. कोलेज मधल्या पारावर ठेवलेली रोपं


३. जेव्हा लाला टेम्पो घेऊन आले!


४. रोपं देवराईत वाढताना- The Last Nomad

Comments