कल्पना करा की B.Sc. ला शिकताना त्या शिक्षणात मन न रमणारा मुलगा पुढे जाऊन जीवशास्त्रज्ञ बनतो. आणि नुसताच डिग्री पुरता नाही तर जगभरातील नावाजलेल्या जीवशास्त्रज्ञांमध्ये याचं नाव घेतलं जातं. पण हे वास्तवात शक्य आहे का? आणि हे नेमकं घडलं कसं? ही जादू आहे जंगलाची आणि कथा आहे डॉ. कृष्णमेघ कुंटे यांची.
जर तुम्हाला आजवर निसर्गाने वेड लावलं नसेल तर तुम्हाला मनुष्य 'प्राणी' का म्हणावं हा मला सारखा पडणारा प्रश्न. आपण जर पैसा, करिअर, संपत्ती किंवा इतर कोणत्याही उदात्त हेतूसाठी जगत असू तर आपण स्वभ्रमित झालो आहोत हे समजायला खूप वेळ जाऊ शकतो. या सगळ्या झाल्या आपणच तयार केलेल्या (बऱ्याच अंशी निरर्थक) गरजा पुरवण्यासाठीच्या व्यवस्था. आपल्या घरातल्या, सभोवतालच्या विचारांचा आपल्यावर सतत परिणाम होत असतो. यातून एक तर आपण चाकोरीबद्ध आयुष जगू लागतो किंवा नैसर्गिकपणे प्रत्येकात असणाऱ्या कुतूहलाची, जिवंतपणाची कास धरून आपला मार्ग शोधू लागतो. तुम्ही जर अशा जाणीवा बोथट करणाऱ्या शहरी जीवनात रमून गेला असाल तर सभोवतालच्या निसर्गाबद्दलचं आणि स्वतःबद्दलचं भान हे पुस्तक नक्कीच जागृत करेल. पण पुस्तक हाती घेण्या आधी एक सावधानतेचा इशारा. हे केवळ एक पुस्तक नसून एक टाईम मशीन आहे. स्थळ-काळाच्या मर्यादा ओलांडून हे तुम्हाला कुठच्या कुठे घेऊन जाईल. एका बैठकीत वाचून काढण्याच्या मोहात पाडणारं हे पुस्तक आहे.
निसर्गातील वैविध्य, सामर्थ्य आणि विलोभनीय वर्णनाने ओथंबून वाहणारं जरी हे पुस्तक असलं तरी ते केवळ एक निसर्गरम्य कथन नसून जंगलातील वास्तवाबद्दलचे विदारक मुद्दे मांडणारं अंजन ठरतं. निसर्गप्रेमी असा स्टेटस ठेवणं आणि निसर्ग म्हणजे कशाशी खातात यातला फरक समजण्यासाठी हा एक अत्यन्त उपयुक्त ऐवज आहे. हे वाचताना केतासारखे आदिवासी आणि त्यांच्या गमती-जमती यांच्या प्रेमात तुम्ही नक्की पडाल पण त्यांच्या रोजच्या जगण्यातील होणारी होरपळ पाहून आपला सुशिक्षित आणि सुसंकृतपणाचा शिरपेच थोडावेळ का होईना खाली काढून ठेवाल. मदुमलाईचं भन्नाट जादुई जंगल, त्यातील असंख्य प्राणी, पक्षी, वनस्पती, झाडं, पावसात खळाळत वाहणारी मोयार नदी, कुडकोंबन आणि दादासारखे हत्ती, रानकुत्र्यांचा केलेला पायाचे तुकडे पडे पर्यंतचा पाठलाग आणि बरंच काही या पुस्तकात भरभरून मांडलंय.
पण हे पुस्तक म्हणजे कृष्णमेघ यांच्या रानवेडाची फक्त एक झलक आहे, त्यांच्या पुढील पुस्तकाची ओढ लावणारी आणि त्यांच्यासारख्या रानवेड्यांना खतपाणी घालणारी. पुस्तकाच्या शेवटाकडे येताना मनात उरते ती केवळ निःशब्दता, भल्याभल्या शाहण्यांना वेड लावणारी, मदुमलाईच्या जंगलातली.
पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील लिंक follow करा: https://amzn.to/3gwH0ba
ही पुस्तक ओळख ऐकण्यासाठी युट्युब चानेलला भेट द्या: https://youtu.be/3yMXtBfDJs4
Check out books from the Insight Stories webstore.
Comments