मराठी कविता: बाप गेल्यावर

भर दुपारच्या थकवणाऱ्या उन्हात
अचानक आभाळ दाटून कोरडच गडगडू लागलं तर जितका त्रास  होईल,
तसच काहीसं झालं बाप गेल्यावर.
त्यानंतर तो शोधू लागला आसऱ्यासाठी आईची सावली
पण हाती फक्त लागल्या जीर्ण होत चाललेल्या फांद्या आणि वाळलेली पाने.

बाप गेल्यावर काय संपतं?
ते काही केल्या मोजता येत नाही
आणि जाणीव होते त्याने आयुष्यभर केलेल्या अदृश्य प्रेमाची.
निष्ठुर मन हे स्वीकारत नव्हतं तरी त्याच्या कोरड्या डोळ्यात नकळत पाऊस पडू लागला.

- हेरंब सुखठणकर

Comments