मूल पाहिजे | अतिथी लेखिका: डॉ. स्वाती प्रभू

खरं तर ‘मूल पाहिजे’  हा विषय फार जुना आणि सामान्य आहे. आतापर्यंत बरीच जोडपी त्यासाठी उपचार घेण्यासाठी येताना पाहिलीत. पण काल समोर बसलेल्या जोडप्याने हा लेख लिहायला भाग पाडलं. कारण तपासून औषध देण्याची घटना चालू असतानाच त्यातील स्त्री म्हणाली की, ‘तरी मी यांना सांगेतय, किती दिवस वाट पहायची? तुम्ही दुसरं लग्न करा. कारण तशी त्यांची प्रॉपर्टी खूप आहे. उद्या बघणार कोण? वारस नको?’ आणि मी थबकले. इतक्या सहज तिने आपलं मत मांडलं होतं खरं पण आपसूकच डोळ्यांत पाणी सुद्धा दिसत होतं, कारण तिचाही नाईलाज होता. थरथरत्या आवाजात ती म्हणाली, ‘बरोबर ना, मॅडम?’  आणि मी निःशब्द झाले. काय बोलणार? अज्ञान, मूर्खपणा की अजून काही? 

पण विचार केला, तर आपण सर्वच म्हणजे समाज या परिस्थितीला तेवढेच जबाबदार आहोत.  हे तथ्य मला तिच्यासोबत साधलेल्या संवादाच्या शेवटी सापडले. मूल कशासाठी पाहिजे? या एका प्रश्नाची अनेक उत्तरे ती जराही उसंत न घेता देत होती. ‘कुठे जायला म्हणून नको. चार लोकात गेले की काय सांगू मॅडम? लोकं प्रश्न विचारून विचारून भंडावून सोडतात.’ 

‘तसं ही – म्हातारपणी कोणीतरी आधार पाहिजेच. उद्या आम्ही गेल्यावर पिंड कोण देणार? कूस नाही उजवली तर मेल्यावर मुक्ती कशी मिळणार? बाईचा जन्म घेऊन आई नाही झाले तर खूप मोठं पाप लागेल. वारस कोण नसेल तर वंश कसा पुढे वाढणार? घराणे कसे टिकणार?  मुलच नाही तर म्हातारपणात नातवंड कशी खेळवणार? आणि महत्वाचं म्हणजे, बांझ या शब्दाच्या कचाट्यातून सुटका कशी होणार?’

किती अंधश्रद्धा, किती गैरसमज तिच्या डोक्यातून दूर करायचे? तिच्यासारख्या अनेक बायका ही भळभळती जखम घेऊन मृत आयुष्य जगत आहेत हे विदारक सत्य आहे. या परंपरागत प्रथा, विचार आज कुठेतरी थांबले पाहिजेत, संपुष्टात आले पाहिजेत. सांगायला फार कमीपणा वाटतो की भारत देश या सर्व गोष्टीत अग्रस्थानी आहे. आपल्या देशात या बाबतीत परंपरा अगदी जश्याच्या तशा विस्तारित रुपात पुढे नेल्या जातात. याचा परिणाम म्हणजे आताच्या युवा पिढीला सुद्धा हेच वाटू लागते की लग्न, मुले आणि त्यांचे संगोपन हे जीवनाचे एकमेव ध्येय आहे. आणि काहीतरी सार्थक करू पाहणाऱ्या मुली यात अडकल्या जातात. हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी आपण प्रत्येकाने आपल्यात आणि आपल्या विचारात सुधारणा केली पाहिजे. 

थोडासा खोल विचार केला तर लक्षात येईल की आपण स्वतःला निस्सीम देशभक्त म्हणवतो मग देशाच्या हितासाठी लोकसंख्येचा विचार केला, तर आधीच हाताबाहेर गेलेली लोकसंख्या आवरताना कठीण आहे आणि आपण त्यांत अजून भर घालणार. मर्यादित जागेत वाढत्या लोकांना कुठे ठेवणार? आणि हा समतोल साधणे आता जवळपास अशक्य झाले आहे. त्यामुळे सध्या देशाला संकटात टाकणारा सर्वात मोठा मुद्दा आहे. 
काही हुशार म्हणवणारे पालक म्हणतात, की आमच्या मुलांची जबाबदारी आम्ही घेऊ आणि किती मुलं जन्माला घालायची हे सुद्धा ठरवू. पण याचा प्रचंड प्रमाणात तोटा हा पर्यावरणाला होतोय हे विसरून चालणार नाही. आपलं खाणं-पिणं, राहाणं, जंगलतोड, प्रदूषण यामुळे पृथ्वी विनाशाच्या दरवाज्यावर उभी. यामुळे येणाऱ्या वाढत्या जीवांना संरक्षण देण्याची कुवत बिचारीची कधीच संपली आहे. त्यांना द्यायला प्राणवायू सुद्धा आता शिल्लक नाही. एका माणसाला आयुष्यभर ३०० दशलक्ष लिटर प्राणवायू लागतो. आणि संशोधकांच्या मते प्लास्टिकबंदी सारखे मोठे निर्णय करूनही ही भरपाई होणार नाही. 

विज्ञानाने आपली मर्यादा कधीच आखली आहे. जन्मदर वाढवून मृत्यूदर घसरला आहे. सर्व सोयीसुविधा पुरवल्या आहेत. येणाऱ्या लोकांची तरतूद करण्याचे मार्गही अरुंद झालेत. याचे गांभीर्य आपण लक्षात घेतले पाहिजे आणि ठोस पावले उचलली पाहिजेत. 

महत्वाचा मुद्दा म्हणजे त्या स्त्रीचे आरोग्य. ती तेवढी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम आहे का? हा मुख्य विषय तिच्या सकट साऱ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. लहानपणापासून तिची जडणघडण करताना तिच्या मनावर योग्य संस्कार योग्य रीतीने कोरले पाहिजेत. छान शिक्षण देऊन एखादी कला शिकवून तिला स्वतःला प्रगतीचे मार्ग मोकळे केले पाहिजेत. तिची चेतना विकसित करण्याचे प्रयत्न व्हायला पाहिजेत. कारण देहापलीकडे जाऊन ती ही एक चेतना, एक संवेदनशील जीव आहे. तिलाही मुक्तपणे स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे. मुलाला जन्म देण्याची क्षमता तिच्यात आहे याचा अर्थ तिने प्रत्येक वेळी ते सिद्ध करावे असा होत नाही. नाहीतर हेच वरदान हळू हळू तिला शाप वाटू लागेल.

याची सुरुवात घरातून झाली पाहिजे, तरच समाज कालांतराने स्वीकारेल. काही प्रमाणात स्वीकारलं आहे पण मोजक्याच लोकांनी. अशा स्त्रियांना किंवा कुठल्याही लग्न झालेली स्त्री दिसली की ‘तुला मुलं किती? मुलगे किती आणि मुली किती?’ असे प्रश्न हद्दपार झाले पाहिजेत. ‘आणि अजून नाही झाली तर होतील, नको काळजी करूस.’ अशी सांत्वनपर आशावादी वाक्येही सांगायची अजिबातच आवश्यकता नाही. कारण एकदा ती मुलगी शिक्षित झाली की मुलाविषयीचा निर्णय हा तिचा स्वतःचा वैयक्तिक असेल. आणि तो घेण्यास फक्त तीच समर्थ असेल. आपण तो सार्वजनिक करण्याचा निर्लज्जपणा करू नये.

म्हणून मुलं जन्माला घालूच नये का? तर असं अजिबातच नाही. निसर्गतः मनुष्यजाती टिकून रहावी म्हणूनच तर प्रजननसंस्था दिलेली असते. पण आर्थिक, सामाजिक, शारीरिक, मानसिक सक्षम स्थिती असेल तर एक मूल जरूर वाढवावे. मग ते निराधार वाढवले तरीही चांगले. पण ज्यांना मूल नाही त्यांचाही तेवढाच आदर झाला पाहिजे. त्यांनाही तेवढ्याच उत्साहाने जगू द्यावे. मातृत्व या विषयाचे अवडंबर करून उगाच कोणालाच अपराधीपणाची भावना कोणीच देऊ नये. आणि एक नियम, बंधन किंवा सामाजिक दबाव या गोष्टी मुलाच्या जन्मास कारणीभूत ठरू नये एवढंच वाटते. 

प्रत्येक पालकाने किंवा नवराबायकोने एकदा स्वतःकडे पाहावे. माणूस म्हणून स्वतः जन्माला यावे. कारण जन्म दोन वेळा होतो: एकदा आईच्या गर्भातून आणि दुसरा आत्मज्ञानातून. त्यामुळे स्वतःचे व्यक्तिमत्व समृद्ध करावे जेणेकरून येणाऱ्या जीवाला आपण योग संस्कार, मार्गदर्शन, आयुष्याचा उद्देश आणि मर्म अशा साऱ्याची शिकवण देऊ शकू. आपणच जर अज्ञानी असू तर मुलाचेही आयुष्य अर्थहीन होईल आणि हे सर्वात मोठे पाप! नाही का? त्यामुळे स्वतः ध्येय, आनंद, समाधान घेऊन जगावे आणि दुसऱ्यांनाही मुक्तपणे जगू द्यावे एवढाच हेतू.

- डॉ. स्वाती प्रभू
drswatiprabhu@gmail.comCheck out books from the Insight Stories webstore.

Comments