माणूस म्हणून आपल्याला इतर प्राण्यांपेक्षा भिन्न ठरवणारा गुण म्हणजे आपली बुद्धी आणि भावना. त्यातही विचार केला तर आपली भावनिक गुंतागुंत ही अत्यंत क्लिष्ट बाब आहे. आणि आजच्या AI तंत्रज्ञानाच्या काळात घरातल्या चौघात आणि चार भिंतीच्या पलीकडे हीच भावनिक सरमिसळ पुसट होताना दिसत आहे.
माझा मित्र, डॉ. प्रणव प्रभू याने या चित्रपटाबद्दल लिहिल्यामुळे, 'पारिजात' बद्दल समजले. शहरातील चित्रपटगृह अशा मातीतल्या चित्रपटांना मुकताहेत हे प्रेक्षकांचे दुर्दैव. चित्रपट म्हणून एका ठरलेल्या प्रकारची मनोरंजनाची पुडी बांधली नाही तर अशा विचित्र निकषावरच बरेच उत्तम विषय मांडणारे चित्रपट बाद ठरतात. सुदैवाने युट्युब आणि काही OTT platforms द्वारेच यातील काही मोजके चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचतात.
अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून केलेले चमत्कृतीपूर्ण दिग्दर्शन, १०-१२ गुंडांना लीलया एका हाताने मारणारा 'तगडा' आणि 'चिकना' नायक, आकर्षक कपड्यातली नायिका आणि थिरकायला लावणारी गाणी अशा सवयीच्या मसाल्याला छेद देत 'पारिजात' थेट आपल्या हृदयात अलगद घर करत जातो. साधेपणातले सौंदर्य किती सहज असते याची प्रत्यक्ष अनुभूती म्हणजे 'पारिजात'.
या चित्रपटातील प्रथमदर्शनी लक्षात न येणारा नायक म्हणजे खुद्द कोकण. कोकणच्या लाल मातीतील हिरव्यागार पटलावर सादर होणारी सुंदर कलाकृती म्हणजे 'पारिजात'. गेली काही वर्ष बातम्यातून आणि समाजमाध्यमांतून समोर येणारा व दुर्लक्षित प्रश्न 'कोकण ओस पडतंय', 'कोकणातील तरुणांची संख्या प्रचंड घटली आहे', ' गाव म्हातारं होतेय' अशा मथळ्याच्या लेखातून आपल्या समोर मांडला जात आहे. याच ओस पडणाऱ्या गावातील विरळ होणारे नाते संबंध आणि रक्ताबाहेरच्या नात्यांनी बांधलेले नवे रेशीमबंध यांचा गुलदस्ता म्हणजे पारिजात. प्रत्येकाने आपल्या आजूबाजूच्या लोकांची काळजी घेतली तरच उसवत जाणारी नात्यांची वीण टिकवून ठेवता येईल.
- द लास्ट नोमॅड
चित्रपट नक्की पहा आणि कसा वाटला ते तुमच्या मित्रमंडळीला नक्की सांगा.
युट्युबवर चित्रपट पाहता येईल: पारिजात मराठी चित्रपट
Comments