कांतारा की दशावतार | वाट्याला आली निराशाच!


 


कांतारा की दशावतार, अशी तुलना आणि त्यावर बेतलेले content बऱ्याच समाजमाध्यमांवर पहायला मिळाले आणि हे दोन्ही चित्रपट पाहिले असल्यामुळे ही चर्चा पाहून वाईट वाटते.

मुळात चित्रपट केवळ आपल्या भाषेत आणि आपल्या मायभूमीत केल्यामुळे तोच सरस असा भाबडेपणा तुम्हाला इथे वाचायला मिळेल अशी अपेक्षा असेल तर माफ करा. पुढे वाचू नका. होय, माझी पितृभाषा मराठी आणि माझं गाव देखील तळ कोकणातच आहे. तरीही दोन चित्रपटांची तुलना फक्त आणि फक्त 'सिनेमा' किंवा 'चित्रभाषेवर' आणि कथेवर व्हावी हाच माझा विचार आहे.

या दोन्ही चित्रपटांबद्दल बोलण्या अगोदर, एक कळकळीने सांगावस वाटतं की दिलीप प्रभावळकर या जाणत्या नटाने त्यांच्या परीने उत्तमच अभिनय केला आहे याबद्दल वादच नाही. त्यामुळे त्यांच्या अभिनयाबद्दल बोलण्याचा माझा अधिकार देखील नाही याची मला संपूर्ण कल्पना आहे. तरीही प्रेक्षक म्हणून एक उत्तम चित्रपट काय असतो याची थोडीफार जाण असल्यामुळे हा लेखनप्रपंच.

मुळात कांताराच्या दोन्ही भागांची कथा, पटकथा, आणि चित्रभाषा यांची व्याप्ती कैक पटीने मोठी वाटली. त्यांचा होणारा impact किंवा परिणाम याची जगभरातील प्रेक्षकांनी पावती दिलेली आपल्याला आजही पहायला मिळते. त्यामुळे या चित्रपटांची तुलना करणे हा विचारच अत्यंत भाबडा वाटला.

कांताराच्या पटकथेची गती कुठेही रेंगाळल्यासारखी किंवा लांबवल्यासारखी वाटली नाही. या उलट दशावतार पाहताना नेमका विरुद्ध अनुभव आला. त्यामुळे एका विचारावर शिक्का नक्की मारता येईल तो म्हणजे असा की केवळ सुप्रसिध्द नट, कवी, संगीतकार, गायक आणि निर्माते एकत्र आणल्यामुळे आणि मार्केटिंगच्या जोरावर उत्तम चित्रपट तयार होईल ही कल्पनाच बाळबोध ठरते. मुळात कथाच जर प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात समर्थ नसेल तर ती कोण सादर करते आहे याने (सुदैवाने) फारसा काही परिणाम होत नाही.

माफ करा पण स्पष्टच शब्दात सांगायचं झालं तर दशावतार चित्रपट पाहिल्यानंतर निराशाच झाली. खरं तर मध्यंतर झाल्यावरच बाहेर पडावं असं वाटलं. तरीही कथेचा शेवट नेमका काय हे केवळ पाहण्यासाठी म्हणून थांबावं लागले. कोकणातील दशावतार ही लोककला, राखणदाराची श्रद्धा, परंपरा किंवा संकल्पना, माणसाच्या हव्यासापासून निसर्ग वाचवण्याची गरज या तीन संकल्पनांवरच दशावतार हा चित्रपट उभा करण्याचा प्रयत्न केलेला दिसला पण यांची सरमिसळ प्रभावी पद्धतीने न झाल्यामुळे तो भिडलाच नाही आणि एक जबरदस्त चित्रपट करण्याची संधीच हुकली याचं वाईट वाटलं.

हा लेख लिहिण्यामागे कुणालाही दुखवण्याचा हेतू मुळीच नाही. उलट माझ्या भाषेत, माझ्या मातीत एक उत्तम चित्रपट कसा तयार झाला होता ह्याबद्दल दिग्दर्शक आणि कलाकारांची पाठ थोपटण्याची संधी हुकली याची खंत वाटते. असो. देव बरे करो!🙏

- हेरंब सुखठणकर


Comments